हिमायतनगर: गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उन्हामुळे करपू लागली होती. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, हळद, तूर यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे सुमारे ५० टक्के नुकसान झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शनिवारीपासून तालुक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने हलक्या सरींमुळे पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. गतवर्षी अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती, तर यावर्षी पावसाच्या खंडामुळे कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रति एकर ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध भागातील शिवारात पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पिकांना आवश्यक असलेला समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता मोठ्या पावसाकडे लागले आहे.
यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. सध्या हलक्या पावसाच्या सरी होत असल्याने पिकांना पुरेसा ओलावा मिळत नसून, आगामी काळात दमदार पाऊस झाला नाही तर खरीप पिकांचे उत्पादन धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना आता पावसाच्या दमदार सरींची प्रतीक्षा असून, शासनाने पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.