हिंगोली: सकाळपासूनच (दि.१७) सुरू असलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, काही तासांतच सर्व रस्ते आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले. या जलप्रलयाचा सर्वाधिक फटका कयाधू नदीच्या काठावरील गावांना बसला असून, नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महापुराचे संकट ओढवले आहे.
कयाधू नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे बामणी फाटा ते पिंपरखेड, मार्लेगाव आणि कोळी गावांना जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. परिणामी, या भागातील अनेक गावांचा एकमेकांशी आणि शहराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. यामध्ये मार्लेगाव, बोरगाव, तलांग, पिंपरखेड, बामणी फाटा या गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा आणि थेट फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सोयाबीन, केळी, ऊस आणि कापूस यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
या परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. या नैसर्गिक संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.