पहिल्याच पावसाने कोरडी पडलेली पैनगंगा वाहू लागली आहे 
नांदेड

Nanded Rain News | मृगाच्या पहिल्याच सरींनी किनवटला झोडपले ; शिवणी मंडळात अतिवृष्टी

वीज पडून चार म्हशी दगावल्या : घराचे छप्पर उडून नुकसान

पुढारी वृत्तसेवा

किनवट : यंदा रोहिणी नक्षत्र जवळपास कोरडे गेल्यानंतर सोमवारी (दि. ०८) सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश करताच रात्री किनवट तालुक्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. शिवणी महसूल मंडळात ६६ मि.मी. पावसाची अतिवृष्टी नोंदविण्यात आली असून, वीज कोसळून चार म्हशी दगावल्या तर परोटी तांडा येथे एका घराचे छप्पर उडून नुकसान झाले. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार उपलब्ध सात महसूल मंडळांमध्ये एकूण ३२०.४ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ४५.८ मि.मी. इतकी नोंदविण्यात आली आहे.

महसूल प्रशासनाच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील नऊ महसूल मंडळांपैकी शिवणी मंडळात सर्वाधिक ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल इस्लापूर येथे ५२.५ मि.मी., किनवट व बोधडी येथे प्रत्येकी ४८.३ मि.मी., मांडवी येथे ३९.५ मि.मी., उमरी बाजार येथे ३८ मि.मी. तर सिंदगी-मोहपूर मंडळात २७.८ मि.मी. पाऊस झाला. मात्र दहेली व जलधारा मंडळांतील पावसाच्या नोंदी उपलब्ध झालेल्या नव्हत्या.

दरम्यान, बेल्लोरी-धानोरा परिसरातील पिंपरी शिवारात वीज कोसळून पशुपालक राजहंस देवीदास फड यांच्या चार म्हशी जागीच दगावल्या. त्यामध्ये दोन दुधाळ म्हशी व दोन वगारींचा समावेश असून या घटनेत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच परोटी तांडा येथील रणजीत जयवंत आडे यांच्या घराचे छप्पर उडून नुकसान झाल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मृगाच्या प्रारंभीच झालेल्या या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसाने कोरडी पडलेली पैनगंगा वाहू लागली आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. मात्र तालुक्यात सुमारे ५५२ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी भाजीपाला तसेच ४७ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकांना काही भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिलासादायक पावसासोबतच काही ठिकाणी नुकसानीची चिंताही व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT