मुखेड: तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा परिणाम दूरसंचार सेवांवरही झाला आहे. भेंडेगाव, मौजे होनवडज येथे उभारण्यात आलेला इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे कोलमडले असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
पुराच्या पाण्याने टॉवरच्या परिसरात शिरकाव करून टॉवरच्या रचनेला गंज लागला आहे. पाण्यात भिजल्यामुळे टॉवरवरील इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड निर्माण झाली असून, संपूर्ण टॉवर बंद पडल्याने परिसरात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली आहे. टॉवर परिसरात पाणी साचल्यामुळे तांत्रिक कर्मचार्यांना देखील तिथे पोहोचणे कठीण झाले आहे.
याशिवाय सततच्या पावसामुळे होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेचा थेट परिणाम टॉवरच्या कार्यक्षमतेवर झाला आहे. वीजपुरवठा नसल्याने बॅकअपची यंत्रणाही निकामी झाली आणि टॉवर पूर्णपणे बंद पडला. या टॉवरशी संलग्न असलेल्या मशिनरी व उपकरणांना पाण्याचा फटका बसल्याने कंपनीचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
भेंडेगाव, होनवडज व परिसरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्क नसल्याने संवाद साधणे कठीण झाले असून, आपत्कालीन परिस्थितीतही मदत मिळवण्यात अडचणी येत आहेत. प्रशासनाकडून टॉवर परिसरातील पाणी काढण्याचे आणि नेटवर्क सेवा लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इंडस कंपनीचे अभियंते आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे नुकसानग्रस्त टॉवर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधा कोलमडल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, अशा हवामानातील बदलांचा विचार करून दूरसंचार व्यवस्थेची अधिक बळकटीकरणाची गरज असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.