Nanded Rain updates
नांदेड : जिल्ह्यात वार्षिक पावसाचे प्रमाण ८९१.३० मि.मी. एवढे असून आतापर्यंत ८२० मि.मी. पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या टक्केवारीतील नव्वदी ओलांडली आहे. दरम्यान दि. १ जूनपासून १ सप्टेंबर या चार महिन्यांत पडणाऱ्या अपेक्षित पावसाच्या सरा-सरीच्या तुलनेत १२४.५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार किनवट तालुक्यातील ५ व नांदेडमधील लिबगाव अशा सहा मंडळात अतिवृष्टी झाली.
या वर्षीच्या पावसाळ्यात जून व जुलै या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण किरकोळ होते. परंतु ऑगस्टच्या १४ तारखेपासून सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरूच आहे. या कालावधीत सातत्याने अतिवृष्टी होत असून नांदेड जिल्ह्याचे ९३ महसुली मंडळांपैकी ८० पेक्षा अधिक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. २९ ऑगस्ट रोजी पाच मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यात किनवटमधील तीन तर माहूरमधील दोन मंडळांचा समावेश होता. आता पुन्हा सहा मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
किनवट तालुक्यातील किनवट शहरात ६५ मि.मी., इस्लापूर ८९, जलधरा ९७.२५, दहेली ६८.५० तर उमरी बाजार या मंडळा ७३.५० मि.मी. पाऊस झाला. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १७.३० मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस किनवटमध्ये ६३ मि.मी. नोंदविल्या गेला आहे. या वर्षी आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत १२४.५८ मि.मी. पाऊस झाला असून ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाचे नांदेड जिल्ह्याचा इतिहास आहे.