नांदेड : शहरातील मन्यार गल्ली भागात टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाच्या नावाखाली 'मेड इन पाकिस्तान' असलेल्या बनावट आणि मानवी आरोग्याला अत्यंत घातक ठरणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांची सर्रास विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतवारा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी (९ जुलै) रात्री संयुक्त कारवाई करत एका गोदामावर आणि दुकानावर छापा टाकला.
या कारवाईत भारतात पूर्णपणे बंदी असलेला तब्बल ३९ लाख ६९ हजार ९४० रुपयांचा पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला असून, दुकान मालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद जियाऊद्दीन मोहम्मद बाजीद (वय २५, रा. मन्यार गल्ली, ह.मु. हैदरबाग, देगलूर नाका, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मन्यार गल्लीतील 'अफरा कलेक्शन' (अफ्रा जनरल स्टोअर्स) या दुकानात आणि गोदामात भारतात बंदी असलेल्या पाकिस्तानी उत्पादनांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती इतवारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी अशोक राठोड यांना सोबत घेऊन गुरुवारी रात्री अचानक छापा टाकला.
या कारवाईत थेट पाकिस्तानातून आयात केलेली, कोणतीही पावती (बिल) किंवा वैध परवाना नसलेली तब्बल ३८ प्रकारची बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिसुचना क्र. 06/2025-2026 नुसार पाकिस्तानातून कोणत्याही मालाच्या आयातीवर देशात पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जळबाजी एकनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त उत्पादनांची लॅबमध्ये होणार तपासणी
जप्त करण्यात आलेली ही उत्पादने अप्रमाणित असून, त्यांच्या वापरामुळे मानवी शरीराला आणि त्वचेला मोठी इजा किंवा गंभीर आजार होण्याची दाट शक्यता आहे. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये नेमके कोणते घातक रासायनिक घटक मिसळले गेले आहेत, याची तपासणी करण्यासाठी एफडीएचे अधिकारी अशोक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादनांचे विविध नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
रॅकेटच्या मुळाशी जाण्याचे आदेश!
पाकिस्तानी उत्पादनांचा एवढा मोठा साठा शहरात सापडल्याने पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि डीवायएसपी प्रशांत शिंदे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. जप्त करण्यात आलेल्या मालाची पाहणी करून एसपी डॉ. रोहन यांनी या आंतरराष्ट्रीय लिंक असलेल्या बेकायदेशीर रॅकेटच्या मुळाशी जाण्याचे आणि यामागील मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) कोण आहे, याचा कसून शोध घेण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत.