नायगाव: बाळासाहेब पांडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काळात होणाऱ्या जि. प., पं. स. च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि बरबडा जि.प. गट हा ओपन म्हणजेच सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तर बरबडा पंचायत समिती गण सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी सुटत असल्याने सर्वत्र अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी चालू केली आहे.
गेल्या चार टर्ममध्ये एकही उमेदवार बरबडा गावामधून जि. प. सदस्य म्हणून निवडून आला नाही ? याचे मूळ कारण म्हणजे गावकरी गावातला उमेदवार सोडून आयात उमेदवाराच्या मागे राहिले आहेत. त्यामुळे आजही बरबडा गटावर अनेकांची नजर असून त्यांची मदार अवलंबून आहे.
गेली २० ते २५ वर्षातल्या जवळपास ५ ते ६ निवडणूक कालावधीचा इतिहास पाहता आजपर्यंत जि. प. सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांपैकी केवळ दोनच सदस्य असे होते की त्यांचे गाव स्वतः बर्बडा गटात समाविष्ट आहे. पण सर्वात जास्त मतदार संख्या असलेल्या बरबडा गावातून आजपर्यंत एकही व्यक्ती जि. प. सदस्य म्हणून निवडून येऊ शकला नाही. तर ते दोन सदस्य वगळता अन्य निवडून आलेले सर्व सदस्य हे गटाबाहेरून आयात केलेले म्हणजे त्यांचं मतदान तर सोडाच पण त्याचं गावही बरबडा गटात नसतांना बाहेरून येऊन निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले आणि पाच वर्षे सत्ता करून गेले. बरबडेकर मात्र सुरुवातीपासूनच हेवा दाव्याच्या राजकारणात कधी याच्या मागे तर कधी त्याच्या मागे राहत गावाचा विचार न करता आयातांनाच मदत करत आपले सर्वस्व पणाला लावत राहिले.
आता तरी व्हा सावधान असे म्हणत काही तरुण गावकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत. जो कोणी उमेदवार ठरेल त्याला संपूर्ण गावकऱ्यांनी आपला उमेदवार हाच आपला पक्ष असे समजून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी गावकऱ्यांची बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. येणारा काळच ठरवेल की बरबडेकरांच्या विचारात आणि निर्णय क्षमतेत काही बदल होईल का ? ते पाहण्याची उत्सुकता अनेक जाणकारांना लागली आहे.
गेल्या काही दिवसापासून बरबडा गावातून प्रबळ कोणी जि. प. च्या निवडणूक रिंगणात उतरलाच नाही किंवा तसा सर्वबाजूने सक्षम व्यक्ती बर्बडामध्ये नाहीच असेही नाही, तीन ते चार निवडणुकीत या गावामधून कधी कोणी तर कधी कोणी असे करत उमेदवारी दाखल करून रणांगण गाजवलेच होते. परंतु त्यांना त्यावेळी अपयश आले तर अनेक वेळा आरक्षणाची अडचण आली. आणि आयात उमेदवारानी बाजी मारली. आजपर्यंतच्या या सर्व घडामोडींचा आढावा पाहता आता आगामी जि. प., पं. स. निवडणुकीच्यावेळी तर गावकरी जागृत होतील का ? आणि मागे झाले तेच यापुढेही होऊ नये यासाठी पुढाकार घेऊन काही प्रयत्न करतील का ? यावेळी तर सर्वानुमते गावातून एखादा उमेदवार उभा करून मतभेद, पक्षभेद बाजूला सारत सर्वजण एकवटून त्याला निवडून देतील का ? असे एक ना अनेक सवाल जाणकार मतदारांच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहेत.