बालाजी पेटेकर
आदमपूर : अटकळी जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला राखीव प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे येथे अनेकजण ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यापैकी मारोतराव राहिरे, विजय मुंडकर, विठ्ठलराव माने, बिरादार गुरुजी, अरविंद पेंटे यांच्यासह दोन "माणिक" मुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असे बोलले जात आहे.
ते दोन माणिक म्हणजे 'माणिक'राव लोहगावे आणि 'माणिक'प्रभू पेंटे हे निवडणुकीत उतरल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे. बिलोली तालुका हा माजी मंत्री माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांची या मतदारसंघासह अटकळी गटावर मजबूत पक्कड आहे. भाजपाकडून चर्चेत असलेले युवा नेते माणिकराव लोहगावे व राष्ट्रवादीच्या (अ.प. गट) वाटेवर असलेले माणिकप्रभू पेंटे यांच्या गाव भेटीचे राऊंड पूर्ण झाल्याचे कळते. सामान्य जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा सपाटा अनेक इच्छुक उमेदवारांनी लावलेला आहे. मीच कसा प्रभावी उमेदवार हे प्रत्येकाने मतदाराच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत असताना दिसुन येत आहेत.
नायगाव चे पंचायत समिती सभापती पद असो तथा नरसी जिल्हा परिषद मधून जिल्हा परिषद चा अनुभव असो माणिकराव लोहगावे यांच्याकडे निवडणुकीचा चांगला अनुभव आहे तर प्रभाकर पेंटे यांची होमपिचवर चांगली पकड आहे. जर प्रभाकर पेंटे यांनी काँग्रेसचा हात सोडून हातात घड्याळ बांधल्यास दादांच्या अनुभवांचा व या गटावर त्यांची मजबूत असलेल्या पकडचा फायदा होऊ शकतो, असे जनतेतून बोलले जात आहे. इतर उमेदवारांसह या दोन माणिकपैकी कोणत्या 'माणिक'चे नशीब चमकणार हे येणारा काळच ठरवेल.