Nanded Political News
विशेष प्रतिनिधी
नांदेड : भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात 'भाजपा फोडो' अभियान चालवत या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य केलेले असताना दुसरीकडे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्यावर नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने 'भाजपा जोडो'ची विशेष जबाबदारी टाकली आहे.
चिखलीकर आणि त्यांचे बहुसंख्य सगेसोयरे मागील एक वर्षांपासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत. या पक्षाचे आमदार झाल्यानंतर चिखलीकर यांनी मागील काही महिन्यांत भाजपाचे अनेक माजी पदाधिकारी आपल्या विद्यमान पक्षात आणले. लोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी भाजपाच्या शरद पवार यांना फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली. वडिलांची भाजपा फोडो मोहीम सुरू असताना दुसरीकडे प्रणिता देवरे ह्या मात्र भाजपातच असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील भाजपाची सूत्रे खासदार अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थकांकडे आल्यानंतर मागील वर्षभरात प्रणिता यांना पक्षाचे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम आणि महत्त्वाच्या बैठकांतून डावलण्यात आल्याचे दिसून आले. त्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असल्या, तरी चव्हाण गटाने त्यांना पक्षात बेदखल केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपा महिला मोचनि वेगवेगळ्या विभागांसाठी निवडणूक संचालन समिती स्थापन केली आहे.
या समितीच्या मराठवाडा विभाग प्रमुखपदी प्रणिता देवरे-चिखलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती झाल्यानंतर देवरे यांनी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांचे आभार व्यक्त केले. ही नियुक्ती झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे तीन जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाच्या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार श्रीजया चव्हाण यांनी साधी दखलही घेतली नाही. या पार्श्वभूमीवर प्रणिता देवरे यांनी संस्थांच्या छत्रपती स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात संभाजीनगरातील भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. याच दौऱ्यात त्यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांचे विरोधक प्रशांत बंब यांच्या तसेच भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली.
प्रणिता देवरे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. लोहा-कंधार हे त्यांचे प्रामुख्याने कार्यक्षेत्र असले, तरी या दोन्ही ठिकाणी सुरु असलेल्या नगरपालिका निवडणुकांत पक्षाच्या स्थानिक कारभाऱ्यांनी त्यांना कोठेही आमंत्रित केलेले नाही.