Nanded Cannabis Seized : कापसाच्या शेतात गांजाची लागवड; २५ झाडे जप्त Pudhari
नांदेड

Nanded Cannabis Seized : कापसाच्या शेतात गांजाची लागवड; २५ झाडे जप्त

पोखरी येथे अमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

लोहा : पोखरी (ता. लोहा) येथे कापसाच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आणि लोहा पोलिसांनी बुधवारी (दि. १६) सायंकाळी चारच्या सुमारास संयुक्त कारवाई करत कापसाच्या शेतातून गांजाची २५ झाडे जप्त केली. जप्त केलेल्या गांजाचे वजन २१ किलो ७५० ग्रॅम असून, त्याची अंदाजे किंमत १० लाख ८७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोखरी येथील शेतकरी राजाराम ताटे यांच्या कापसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथक आणि लोहा पोलिसांनी संबंधित शेताची पाहणी केली. यावेळी कापसाच्या पिकामध्ये गांजाची २५ झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून ही झाडे जप्त केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कापसाच्या पिकाच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याने या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. गांजाची लागवड किती कालावधीपासून सुरू होती, त्यामागील उद्देश काय होता तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई अमली पदार्थ विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लोहा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद घोडके, पोलिस निरीक्षक दिगंबर कोपरे, पोलिस उपनिरीक्षक नितीन पवार, संतोष पाटील, पोलिस अंमलदार तानाजी येळगे, शंकर गायकवाड, गणेश जाधव, महेंद्र दासरेवार, नरेंद्र तिडके यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

पोखरी येथील कापसाच्या शेतात गांजाची झाडे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, गांजाच्या लागवडीमागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT