Nanded News 
नांदेड

Nanded News| महाराष्ट्राचा पहिला ‘पुनर्वनीकरण’ कार्यक्रम यशस्वी : पैनगंगा अभयारण्यात मादी वाघीणीचे यशस्वी स्थलांतर

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत भागवत

उमरखेड : पैनगंगा वन्यजीव अभयारण्याच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची व ऐतिहासिक घडामोड घडली असून महाराष्ट्रातील पहिला ‘पुनर्वनीकरण’ कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी पीकेटी-७ सीपी-२ ही पेंच अभयारण्यातील मादी वाघीण पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात यशस्वीपणे स्थलांतरित करण्यात आली असून ती आता अभयारण्यात पूर्णपणे स्थिरावली आहे. तिला एक महिना पूर्ण झाला असून तिची प्रकृती व हालचाली समाधानकारक असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

पैनगंगा अभयारण्यात २०१८-१९ पासून पीएनजी-१ (जॉनी) हा नर वाघ अधिवास करत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून तो येथे वास्तव्य करत असताना भविष्यात जवळच्या नात्यातील संकर (आंतरसंकर) मुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांचा मुद्दा ढाणकी येथील वन्यजीव प्रेमी प्रतिक राठोड यांनी १ जुलै २०२४ रोजी वनमंत्रालयाकडे सादर केलेल्या निवेदनातून मांडला होता. अभयारण्यात मादी वाघीण स्थलांतरित करून वाघांची सुदृढ संख्या वाढविण्याची मागणी त्यांनी केली होती.

या मागणीची गांभीर्याने दखल घेत वनमंत्री गणेश नाईक, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष कार्य अधिकारी महेश शेवाळे (वन मंत्रालय), प्रमुख मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीनिवास रेड्डी (महाराष्ट्र राज्य) तसेच पांढरकवडा वन्यजीव विभागाने यावर दोन वर्षे अभ्यास केला. अखेर यावर सकारात्मक निर्णय घेत कार्यवाही करण्यात आली. पेंच अभयारण्यातील एक मादी वाघीण येथे स्थलांतरित करण्यात आली. समन्वित प्रयत्नांतून महाराष्ट्रातील पहिला पुनर्वनीकरण उपक्रम प्रत्यक्षात उतरला.

या उपक्रमामुळे पैनगंगा अभयारण्यात सुदृढ वाघांची संख्या वाढण्यास चालना मिळणार असून अनुवांशिक विविधता टिकविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाघांचे दीर्घकालीन भविष्य अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी धिरज मदने यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पैनगंगा अभयारण्यातील पर्यटनालाही नवे बळ मिळाले आहे. खरबी प्रवेशद्वार व मन्याळी प्रवेशद्वार येथे सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी सात वाहनांच्या वनभ्रमंती सुरू करण्यात आल्या असून पर्यटक मोठ्या उत्साहाने या वनभ्रमंतीचा आनंद घेत आहेत. या उपक्रमामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून परिसराच्या शाश्वत विकासालाही चालना मिळत आहे. वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास या तिन्ही आघाड्यांवर सकारात्मक पाऊल टाकत पैनगंगा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्राच्या संवर्धन इतिहासात नवा अध्याय रचत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT