Basar Navipet Track Doubling
नरेंद्र येरावार
उमरी : बासर ते नवीपेठ रेल्वे लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे 17 ते 23 जानेवारी या कालावधीत नांदेड–निजामाबाद दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या कालावधीत नांदेड ते निजामाबाद दरम्यान धावणारी जाणारी व येणारी सवारी रेल्वेगाडी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
तसेच दौंड–निजामाबाद, निजामाबाद–पंढरपूर, मनमाड–धर्माबाद, धर्माबाद–मनमाड, पंढरपूर–निजामाबाद आणि निजामाबाद–पुणे या सहा रेल्वेगाड्या निजामाबाद ते मुदखेड या दरम्यान अंशतः रद्द राहणार आहेत. दरम्यान, नांदेड–मेडचल, विशाखापटनम–नांदेड, काचीगुडा–नरखेड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–लिंगमपल्ली, भगत की कोठी–काचीगुडा आणि काचीगुडा–नरखेड या सहा रेल्वेगाड्या एक ते दोन तास उशिराने धावणार आहेत.
परभणी ते नांदेड या लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून सध्या नांदेड ते निजामाबाद या मार्गावरील रुंदीकरण आणि दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. याच पार्श्वभूमीवर बासर ते नवीपेठ या टप्प्यात 17 ते 23 जानेवारीदरम्यान सात दिवस दोन रेल्वेगाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सहा रेल्वेगाड्या मुदखेड ते निजामाबाद दरम्यान अंशतः रद्द ठेवण्यात आल्या असून आणखी सहा गाड्या उशिराने धावणार आहेत.
या संदर्भात नांदेड रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या लोहमार्गावर दुरुस्ती व सुधारणा काम सुरू असून विद्युतीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे इंजिने आता विद्युत प्रणालीवर धावत आहेत. दुहेरीकरणासाठी नवीन रेल्वे पटरी टाकण्याचे काम विविध ठिकाणी सुरू असून बहुतांश पुलांची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. या कालावधीत प्रवाशांना शक्य तितक्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही सांगण्यात आले आहे.