नरेंद्र येरावार
उमरी : तालुक्यातील कावलगुडा बुद्रुक येथे झालेल्या आंबील भंडा-यातून जवळपास 250 जणांना विषबाधा झाली आहे. मंगळवारी सायंकाळी काही जणांना मळमळ उलट्या संडास सुरू झाल्यानंतर उमरी येथील ग्रामीण रुग्णालय, सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, धर्माबाद, कारेगाव, करखेली येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास 250 आहे. त्यापैकी दहा रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य विभागाचे एक पथक गावात तळ ठोकून आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत (तीन वाजेपर्यंत) विषबाधा झालेल्या रुग्णांवर विविध ठिगाणी उपचार सुरू होते. त्यानंतर बुधवारी सकाळी देखील दहा ते पंधरा रूग्ण दाखल झाले आहेत.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रांती शिलेदार, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन देवराये यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे. मंगळवारी कावलगुडा बुद्रुक येथे भंडारा होता. या भंडाऱ्याचे जेवण गावातील जवळपास सर्वच नागरिक,वृध्द, महिला, बालकांनी केले. सायंकाळच्या सुमारास काही जणांना मळमळ सुरू झाली तर काहीजणांना जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उमरीतील रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या एकदम वाढली. त्यामुळे उपचारार्थ एकदाच आलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या व्हरांड्यात उपचार घ्यावे लागले. शिवाय काही रुग्णांना सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर उमरी, धर्माबाद, कारेगाव, करखेली या भागातही असंख्य रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रांती शिलेदार, तालुका आरोग्य अधिकारी मोहन देवराये, डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. मारोती चंदापुरे, डॉ. मुनेश्वर यांच्यासह आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचारी, सिस्टर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. उमरी ग्रामीण रुग्णालयात 122, सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 32 आणि इतर खाजगी ठिकाणी उपचार घेत असलेल्यां रुग्णांची संख्या जवळपास 250 च्या वर आहे. दुसऱ्यादिवशी
बुधवारी दुपारपर्यंत दहा ते पंधरा रूग्ण उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. सर्वांवर औषधोपचार करून काही रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. सरपंच ब्रह्मनंदा बाबुराव भुते, उपसरपंच शेषराव रोडेकर, ग्रामसेविका यु.जी. मुपडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार मंजुषा भगत, पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, जिल्हा शैल्यचिकित्सक देशमुख मॅडम यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.....