नांदेड : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या माजी मंत्र्यासह सर्व आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी व या प्रकरणाची सत्यता महाराष्ट्राच्या समोर यावी, यासाठी आज (दि.११) नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा आर-क्षणाचे प्रणेते पाच कोटी मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी पोट तिडकीने लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आता एक नाव राहिले नसून अखंड मराठा समाजासाठी दैवत बनले आहे. आपल्या शरीराची चाळणी करीत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळे आंदोलने आणि उपोषणे करून समाजाला न्याय मिळवून दिला.
अशा प्रामाणिक आणि इमानदार नेतृत्वाला कायमचे संपवण्यासाठी काही समाजविघातक लोकांनी कट रचल्याची बातमी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून समजली. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आणि जिल्हा जिल्ह्यातून मराठा बांधव आंतरवालीकडे कुच करू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे की, या प्रकरणाचा तपास हा एसआयटी मार्फत करून यातील सत्य बाहेर आणून, आरोपींनी अटक करावी. अन्यथा महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.