मुदखेड (नांदेड) : मुदखेड तालुक्यातील जवळा (मुहार) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील चार जणांचे मृतदेह गुरुवारी (दि. २५) सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी हादरला आहे. पती-पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन, तर त्यांच्या दोन तरुण मुलांनी रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले. रमेश होनाजी लखे (५१), त्यांची पत्नी राधाबाई लखे (४४), मुलगा उमेश लखे (२५) आणि बजरंग लखे (२२) अशी मृतांची नावे आहेत.
गुरुवारी सकाळी मुदखेडजवळच्या मुगट रेल्वेस्थानक परिसरात लोहमार्गावर उमेश आणि बजरंग या दोन भावांचे मृतदेह आढळून आले. त्यांची ओळख पटल्यानंतर पोलिस आणि कान नागरिक जवळा (मुहार) येथील त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी घराचे दार उघडेच होते, दाराला कडी नव्हती. आत जाऊन पाहिले असता रमेश आणि राधाबाई हे पती-पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मुलांनी आत्महत्या केल्यानंतर पालकांनी हे पाऊल उचलले की, पालकांच्या मृत्यूनंतर मुलांनी जीवन संपवले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मृत रमेश यांना तीन भाऊ आणि चार बहिणी असून, ते गावात विभक्त राहत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तातडीने जवळा येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनीही लखे कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीला दुजोरा दिला. फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी घर सील केले आहे. सध्या मुदखेड आणि बारड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूची वेळ आणि कारण स्पष्ट होईल, असे अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.
आर्थिक परिस्थिती आणि आजारपण
लखे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्याकडे केवळ ४ एकर शेती होती. कुटुंबप्रमुख रमेश लखे हे हृदयविकाराने त्रस्त होते. अलीकडेच त्यांच्यावर नांदेडच्या एका रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. गरिबी, आजारपण आणि कर्जाच्या विवंचनेतून या कुटुंबाने हे सामूहिकरीत्या टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980