नांदेड: शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील सुपुत्र तथा महाराष्ट्र सुरक्षाबल दलात मुंबई येथे कार्यरत असलेले जवान संजय भुजंग पेंटलवाड यांचे दि.१५ मे रोजी पहाटे मुंबई येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 27 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज 16 मे शनिवार रोजी सकाळी शेळगाव गौरी येथे करण्यात येणार आहे.
शेळगाव गौरी येथील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला संजय पेंटलवाड हा भुजंगराव पेंटलवाड यांचा एकुलता एक मुलगा आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अगदी बालवयापासून तो मेहनत करत असे, तो वयाच्या विसाव्या वर्षी प्रथम तो बीएसएफ मध्ये सेवा बजावले यानंतर त्यांनी गेल्या अडीच वर्षापासून मुंबई येथे एम एस एफ (महाराष्ट्र सुरक्षाबल दलात दाखल झाले होते ते नेहमी प्रमाणे 15 मे रोजी सेवा बजावत असताना त्यांना पहाटेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.
ही दुःखद घटना शेळगाव गौरी येथे समजताच गावभर शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवावर आज १६ मे शनिवार रोजी शेळगाव गौरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संजय पेंटलवाड यांच्या पश्चात वयोवृद्ध माता-पिता, पत्नी आणि दोन बहिणी असून ते जिल्हा परिषद शिक्षक सर्जेराव नारायण पेंटलवाड यांचे पुतणे आहेत .