नायगाव : घुंगराळा गावातील कला क्षेत्रात आपल्या बहुआयामी कलागुणांनी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ कलाकार श्रीधर उर्फ बाळू पांचाळ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने घुंगराळा परिसरात शोककळा पसरली असून कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
बाळू पांचाळ हे उत्कृष्ट गायक वादक कलावंत म्हणून परिसरात परिचित होते. अखंड हरिनाम सप्ताह,विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम आणि कलात्मक सादरीकरणांमधून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तसेच कलाक्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि चाहतावर्ग होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रमंडळी, कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. गावातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली. त्यांच्या पश्चात वृद्ध आई ,वडील, पत्नी, दोन लहान मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार (दि. ३० मे)रोजी दुपारी १२: ३० वाजता घुंगराळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
वारकरी संप्रदाय व कलावंता कडून शोक संदेशांसह आर्थिक मदतीचा वर्षाव श्रीधर उर्फ बाळू पांचाळ यांच्या निधनाने घुंगराळा परिसरातील कला क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जीवन जगणाऱ्या बाळू पांचाळ यांच्या कुटुंबियांचे जीवन केवळ आणि केवळ कला क्षेत्रात मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून होते. तोच कुटुंबाचा आधार होता. याची जाणीव ठेऊन परिसरातील कीर्तनकार व कलाकार मंडळींनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत पाठवली आहे. जवळपास एक लाख वीस हजार रुपये निधी संकलन झाले असून मदतीचा ओघ चालूच आहे, अशी माहिती ग्रामस्थानी दिली. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कलाविष्काराची आणि सामाजिक बांधिलकीची आठवण कायम स्मरणात राहील, अशा भावना सर्वत्र व्यक्त केल्या जात आहेत.