नांदेड

Nanded news | ऑपरेशन फ्लश आऊट ; पिस्तुलसह तस्कर गजाआड

एलसीबीच्या पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. संघसेन नगर परिसरात विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीर गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रितम ऊर्फ बबलुलाला आनंद लोखंडे (वय २२, रा. संघसेन नगर, इतवारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३१ हजार रुपये किमतीचे पिस्तुल, एका जिवंत काडतुसासह तस्कर जप्त करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवि वाहुळे आणि त्यांचे पथक १५ एप्रिल रोजी पेट्रोलिंगवर होते. दरम्यान, संघसेन नगर भागात एक तरुण पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संघसेन नगर परिसरात सापळा रचून छापा टाकला. यावेळी प्रितम लोखंडे याला संशयास्पद स्थितीत ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तुल आणि काडतूस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल जप्त करून आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी इतवारा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या पथकाने बजावली कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवि वाहुळे, पोउपनि बळीराम दासरे, माधव केंद्रे, सपोउपनि गुंडेराव करले, पोलीस अंमलदार दिलीपकुमार चंचलवार, मिलींद नरबाग, मोतीराम पवार, मारोती मोरे, चालक सिध्दार्थ सोनसळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT