श्रीक्षेत्र माहूर : येथील जिल्हा परिषदच्या भोजंती तलाव प्राथमिक शाळेत (दि. 4 फेब्रुवारी) माध्यान्ह सत्रात माकडाच्या हल्ल्यात तिसऱ्या वर्गात शिक्षण घेणारा हर्षद संदीप गावंडे हा विद्यार्थी जबर जखमी झाला आहे. माकडाच्या हल्ल्यात त्याचा हात मोडला आहे. माकडं, भटकी कुत्रे व मोकाट जनावरापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होण्यासाठी शाळेभोवती तटसंरक्षक भिंत उभा करण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे.
माहूर शहरातील जि.प.च्या भोजंती तलाव या प्राथमिक शाळेभोवती माकडाचे मोठमोठे कळप,भटकी कुत्रे व मोकाट जनावरांचा सारखा वावर असतो. त्यामुळे त्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी कायमच धास्तावलेले असतात. बुधवार (दि.४ फेब्रुवारी) रोजी मध्यान्ह भोजनाच्यावेळी शाळेच्या प्रांगणात खेळतांना एक माकडाने गरीब कुटुंबातील हर्षद गावंडे या विद्यार्थ्यावर हल्ला केला. त्यात त्याचा हात मोडला (फ्रॅक्चर) आहे. यावेळी उपस्थित विद्यार्थी प्रचंड घाबरले होते.
हर्षद हा विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने त्याच्या उपचारांसाठीचा खर्च त्याच्या कुटुंबासाठी मोठा भार ठरला आहे. जखमी विद्यार्थ्याचा झालेला वैद्यकीय खर्च आणि आर्थिक मदत शासनाने द्यावा,अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरूदास राठोड यांनी केली आहे. माकडं व इतर प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शाळेभोवती उंच तटसंरक्षक भिंत उभारणे नितांत गरजेचे असल्याचे मुख्याध्यापक सिद्धार्थ सोनकांबळे यांनी सांगितले.