lightning strike Pudhari
नांदेड

Nanded Rain Updates : किनवट तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून ४ म्हशी दगावल्या

धानोरा-पिंपरी शिवारातील घटना

पुढारी वृत्तसेवा

किनवट : तालुक्यात सोमवारी (दि. ८) सायंकाळी झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज कोसळून चार म्हशी दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. धानोरा-पिंपरी शिवारातील या घटनेत दोन दुभत्या म्हशींसह दोन वगारूंचा मृत्यू झाल्याने शेतकरी कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.

किनवट तालुक्यात सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचवेळी बेल्लोरी-धानोरा येथील शेतकरी राजहंस देवीदास फड यांच्या मालकीच्या जनावरांवर पिंपरी शिवारात अचानक वीज कोसळली. ही घटना सूर्यकांत आत्माराम नागरगोजे यांच्या शेतात घडली. वीज पडताच सुमारे तीन वर्षे वयाच्या दोन दुभत्या म्हशी आणि दोन वगारू जागीच मृत्युमुखी पडल्या.

या दुर्घटनेमुळे पशुधनावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या फड कुटुंबास मोठा आर्थिक फटका बसला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दुभती जनावरे हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे या नुकसानीमुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह परिसरातील शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. महसूल व पशुसंवर्धन विभागाने तातडीने पंचनामा करून शासनाच्या नैसर्गिक आपत्ती मदत निकषांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT