किनवट (प्रतिनिधी): हमीभावाने सोयाबीन विकूनही गेल्या तीन महिन्यांपासून पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला. बुधवारी (दि. २५) संतप्त शेतकऱ्यांनी किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीवर धडक देत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून, सहकार विभागाने तातडीने हस्तक्षेप करत बाजार समितीच्या गोदामाला सील ठोकले आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या सचिवावर निलंबनाची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन सभापतींनी दिले आहे.
शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केली होती. मात्र, तीन महिने उलटूनही हक्काचे पैसे (चुकारे) न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगाम तोंडावर असताना पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समिती गाठली. मात्र, यावेळी सचिव आर. एस. राठोड अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकच अनावर झाला.
सहकार अधिकारी एल. जी. अय्यर यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गोदामाची पाहणी केली असता अनेक अनियमितता समोर आल्या:
नियोजनाचा अभाव: खरेदी केलेले सोयाबीन मुदतीत वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आले नाही.
नोंदणीत घोळ: तपासणी दरम्यान काही कर्मचारी गैरहजर होते, तर हजेरी मस्टरही उपलब्ध नव्हते.
अधिकारी टाळाटाळ: लातूर विभागीय कार्यालयाचे अधिकारी चौकशीसाठी आले खरे, पण शेतकऱ्यांशी संवाद न साधताच निघून गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे यांनी या सर्व प्रकरणाचा दोष सचिवांवर ठेवला आहे. "सचिवांच्या हलगर्जीपणामुळे ही वेळ आली असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया राबवण्यात येईल," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, येत्या शुक्रवारपर्यंत (दि. २७) सर्व शेतकऱ्यांचे थकीत चुकारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
"आम्ही जानेवारीत सोयाबीन विकले, पण अद्याप पैसे मिळाले नाहीत. मागील वर्षाचेही काही पैसे थकीत आहेत. आता पेरणीसाठी पैसे हवे आहेत, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करून आम्हाला व्याजासह रक्कम मिळायला हवी." — सौ. सुषमा आयलेनीवार, महिला शेतकरी (बेल्लोरी)
शेतकऱ्यांनी प्रशासनाला शुक्रवारपर्यंतची मुदत दिली आहे. जर दिलेल्या मुदतीत पैसे मिळाले नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे किनवट बाजार समितीच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता सर्वांचे लक्ष शुक्रवारच्या निर्णयाकडे लागले आहे.