हणेगाव ः देगलूर तालुक्यातील हणेगाव व मरखेल परिसरात देशी विदेशी अवैध दारूचा महापूर वाहत आहे. दारूचे अड्डे, ग्रामीण भागातील हॉटेल, खानावळी व पानटपरीसह खुलेआम अवैध देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याने ग्रामीण भागातील युवा पिढी दारुच्या आहारी गेली आहे.
ग्रामीण भागातील गावागावात वाडी तांड्यावर दारू मिळत असल्याने व्यसनाधीन झालेली तरुण पिढी ही सकाळी चहा घेतल्या सारखी दारू ढोसत असल्याचे चित्र दिसत आहे. तरुण पिढी दारूच्या व्यसनाधीन झाल्याने गुन्हेगारी वाढली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तर अनेकांचे विवाह होत नाहीत. ग्रामीण भागातील असलेल्या अवैध देशी, विदेशी दारूची तस्करी व विक्रीला जबाबदार कोण आहे. उत्पादन शुल्क विभागाचा की पोलीस प्रशासनाचा असा प्रश्न जनतेला पडला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्रीकडे कानाडोळा करून केवळ देशी, विदेशी दारूच्या दुकानांकडून दरमहा चिरीमिरी घेऊन दुकानदारांना गावागावात दारूच्या पेट्या पार्सल करण्याची मूक परवानगी दिली जाते. यामुळे ग्रामीण भागातील देशी दारू दुकानदार रात्रंदिवस खुलेआम देशी दारुची वाहतूक करून ग्रामीण भागातील अड्यावर दारूचा पुरवठा करीत आहेत.
उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी असताना तो विभाग वर कमाईकडे लक्ष देत असल्याने पोलीस प्रशासनाने ही तीच भूमिका घेऊन दारू विक्री करणाऱ्यांना रान मोकळे करून दिले आहे. ग्रामीण भागातील पानटपरी मटण खानावळ, चहाचे हॉटेल असो की रस्त्यालगतची जागा, व्यसनाधीन मंडळी चक्क मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी दारू ढोसत आहेत.
यामुळे दारू पिणाऱ्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तर गावागावात दारू मिळत असल्याने तरुण व व्यसनाधीन झालेले दररोज दिवसभर दारू पिऊन गावात दहशत निर्माण करीत आहेत. यामुळे शांतता भंग होऊन वाद विवाद होत आहेत. खुलेआम दारू मिळत असल्याने दारू पिणाऱ्या अनेक मंडळी चे संसारही उध्वस्त होत आहे.
पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी
घरा घरात भांडण कलह वाढली आहेत चोरी मारामारी आशा गुन्हेगारीत वाढ होत आहे. याला मूळ कारण अवैद्य दारू विक्री असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे या अवैद्य दारू विक्रीला जबाबदार कोण उत्पादन शुल्क विभाग की पोलीस प्रशासन असा. प्रश्न नागरिकांना पडला आहे. याकडे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी लक्ष देऊन मरखेल व हणेगावात सुरू असलेली अवैद्य दारू विक्री करणाऱ्या लोकांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे.