हिमायतनगर :रविवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बोरगडी - धानोरा शिवारात झाडासह विद्युत पुरवठा करणारे रोहित्र उन्मळून पडली. या घटनेत मंदिर सभागृहाचे नुकसान झाले. मात्र जनावरांसह नागरीक बालंबाल बचावले असुन धानोरा गावाकडे जाणारा रस्ता काही वेळ पडलेल्या झाडांमुळे बंद झाला होता.
हिमायतनगर तालुक्यात रविवारी दिवसभर उन्हाचा तडाखा कायम होता. दरम्यान सायंकाळी अचानक ढग दाटून आले. अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने अनेक शिवारातील झाडे कोसळली आहेत तसेच विजेचे खांबदेखील उन्मळून पडली आहेत.
बोरगडी गाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झाडे कोसळली आहेत. तसेच वीज पुरवठा करण्यात येणारे रोहित्र देखील जाग्यावर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील आखाड्यावरील टिन पत्रे उडून गेली आहेत. आखाड्यावर असलेल्या जनावरांना वादळी वाऱ्याने पडलेल्या झाडांमुळे गंभीर दुखापत झाली आहे.
बोरगडी गावासह धानोरा शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील आखाड्यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीजपुरवठा करणारे रोहित्रासह अनेक खांब उन्मळून पडल्याने नुकसान झाले. जनावरांसह नागरीक बालंबाल बचावले असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख संजय काईतवाड यांनी बोलताना दिली आहे. सायंकाळी विजांचा लखलखाट व ढगाळ वातावरण निर्माण झाले. दरम्यान अनेक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता.