उमरी : अमरावतीयेथून तिरुपतीकडे जाणारी (गाडी क्रमांक 12766) ज्या रेल्वेला उमरी रेल्वेस्थानकावर थांबा नाही. अशा रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन मुलींनी उमरी रेल्वेस्थानकावर गाडी थांबत नसल्याचे पाहून रेल्वेतून उड्या मारल्या आणि दोघीही जखमी झाल्या. जखमी पैकी एका मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने
पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उमरी रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेची हकीगत अशी की, उमरी तालुक्यातील आशा गायकवाड रा. रहाटी आणि आकांक्षा शिंदे रा. चिंचाळा या दोन्ही नांदेड येथून उमरीकडे येण्यासाठी अमरावती तिरुपती या सुपरफास्ट रेल्वेत चढल्या. परंतु या सुपरफास्ट रेल्वेचा उमरी रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याचे त्यांचे लक्षात आल्यानंतर उमरी रेल्वेस्थानक येतात गाडीचा वेग कमी झाला त्यामुळेच दोघींनीही धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला आणि फलाटावर पडून जखमी झाल्या.
जखमी मुलींना रेल्वे पोलिसांनी उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथे डा. नितीन कुऱ्हे, परिचारिका नंदा भोसले, मयुरी कल्याणकर यांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याचे पाहून दोघींनाही पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस अधिकारी भीमराव छापेवार यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे उपनिरीक्षक व्ही. सत्यनारायण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
उमरी येथे थांबा देण्याची गरज
तिरुपती अमरावती आणि अमरावती तिरुपती या येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोघी रेल्वे गाड्यांना उमरी रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील रेल्वे विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे या रेल्वेसह अन्य रेल्वेगाड्यांना येथे थांबा देण्यात आला नाही. आता तरी रेल्वे विभागाने दखल घेऊन या रेल्वे गाडीला थांबा द्यावा अशी मागणी होत आहे.