हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील पोटा तांडा येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय शेतकऱ्याने सोनारी शिवारातील जंगल परिसरात जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अशोकराव उत्तम जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांची शेती दुधड शिवारात असून, यंदाच्या खरीप हंगामात पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले. माळरानावरील शेतात पेरलेले बियाणे अपेक्षेप्रमाणे उगवले नाही, तर काही ठिकाणी पेरणी झाल्यानंतरही पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे शेतीसाठी झालेला खर्च, बँकेसह खासगी कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह याबाबत ते चिंतेत असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अशोकराव जाधव यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा तसेच आई-वडील असा परिवार आहे.
शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी
यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे नुकसान, वाढता कर्जबोजा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता यामुळे शेतकरी कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे. जाधव यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.