नायगाव : बारावीच्या गणित विषयाच्या परीक्षेदरम्यान नायगाव तालुक्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तब्बल 3 तास तळ ठोकत कडक पाहणी केली. सव्वा अकरापासून सव्वा दोनपर्यंत केंद्रातच थांबून प्रत्येक वर्गाची तपासणी करत त्यांनी पेपर सील केल्याशिवाय स्थळ सोडले नाही. त्यामुळे हे केंद्र जिल्हाभर चर्चेचा विषय ठरले आहे.
तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. नव्याने स्थापन झालेल्या सोमठाणा येथील केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच धडक देत त्यांनी व्यवस्थेची पाहणी केली. केंद्राजवळ भेटीसाठी आलेल्या संस्था चालक व मुख्याध्यापकांना समज देत बाहेर पाठवण्यात आले. “परीक्षा प्रक्रियेत कोणतीही ढिलाई चालणार नाही,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी थेट बरबडा येथील केंद्र गाठले. येथे प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था, देखरेख, उघड्या खिडक्या, पर्यवेक्षकांची उपस्थिती आदी बाबींची बारकाईने तपासणी करण्यात आली. केंद्रावर आधीच नांदेडहून डाएटचे प्राचार्य तळेकर सर व त्यांचे पथक बैठे पथक म्हणून जिल्हाधिकारी यांनी तैनात केले होते. त्यामुळे संपूर्ण केंद्रावर अत्यंत कडक वातावरणात परीक्षा पार पडली.
जिल्हाधिकारी कर्डिले यांच्यासोबत नायब तहसीलदार विजय येरावाड व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पेपर पूर्ण झाल्यानंतर उत्तरपत्रिका सील करण्याची संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या उपस्थितीत पार पडली. सीलिंगची खात्री झाल्यानंतरच त्यांनी केंद्र सोडले..
या अचानक धडक तपासणीमुळे नायगाव तालुक्यातील इतर सर्व परीक्षा केंद्रांवरही प्रशासन सतर्क झाले. कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा घेण्याचा प्रशासनाचा निर्धार यामुळे अधोरेखित झाला असून, विद्यार्थ्यांमध्येही शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. एकूणच, बारावी गणित पेपरच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कडक भूमिकेमुळे परीक्षा प्रक्रियेला गंभीरतेची धार प्राप्त झाली असून, बरबडा केंद्रावर दाखवलेली माया हा चर्चेचा विषय बनला आहे