ज्ञानेश्वर कोकणे
खानापूर : मौजे खानापूर (ता. देगलूर) येथील इंदिरा आवास नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध शिंदी व दारूविक्रीमुळे संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या प्रकरणात देगलूर येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकास तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
इंदिरा आवास नगर हा रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाचा भाग. दिवसभर कष्ट करून मिळालेल्या मजुरीतील मोठा हिस्सा अवैध दारू व शिंदीवर खर्च होत असल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. काहींनी तर आपला जीवही गमावल्याची उदाहरणे असल्याचा आरोप तक्रारदार नागेश पलपवार व स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिणामी अनेक कुटुंबे उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत नागरिकांनी एकत्र येत नागेश पलपवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नांदेड, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड, उपजिल्हाधिकारी देगलूर, तहसीलदार देगलूर व राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक देगलूर यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
तहसीलदारांनीही याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठविल्याचे समजते. मात्र, संबंधित निरीक्षकांनी या पत्राकडे दुर्लक्ष करून जाणूनबुजून कारवाई टाळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. "लोकांच्या जीवापेक्षा हप्ता महत्त्वाचा ठरतोय का?" असा संतप्त सवाल उपस्थित करत परिसरातील रहिवाशांनी प्रशासनावर निर्षक्रयतेचा ठपका ठेवला आहे. अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक व कौटुंबिक हानी होत असताना जबाबदार अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
संबंधित निरीक्षकास तात्काळ निलंबित करून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा ९ मार्च २०२६ रोजी उपविभागीय कार्यालय, देगलूर समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. आता प्रशासन जनतेच्या आक्रोशाची दखल घेऊन ठोस पावले उचलणार की नाही, याकडे तालुक्याचे लागले आहे.