देगलर : तिरुपतीच्या दर्शनासाठी गेलेले पाच मित्र परत देगलूरला येत असताना त्यांच्या वाहनाचे पाठीमागील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात येथील एका कृषी व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.६ रोजी दुपारी १.१५ वाजता आंध्रातील कडप्पा शहरानजीक पिल्लेरु या गावाजवळ घडली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की येथील बालाजी कृषी दुकानाचे मालक व्यंकटेश तुकाराम येरावार वय ४६ यांच्या मालकीच्या गाडीने देगलूर महाविद्यालयातील प्रा. संतोष येरावार, गणेश कोडगिरे, रुपेश एलबोई (मुक्रमाबाद) विठोबा बोधनकर, व्यंकट रायेवार हे पाच मित्र तिरुपतीच्या दर्शनासाठी गेल्या चार दिवसापूर्वी देगलूरहून गेले होते, दर्शन करून परत येत असताना त्यांच्या वाहनाचे पाठीमागील टायर फुटल्याने गाडी तीन वेळेस रस्त्यावर पलटी झाली.
व्यंकटेश येरावार हे मधल्या जागी बसल्याने ते बाहेर फेकले गेले असावेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मंगळवारी दि.६ रोजी दुपारी जागीच मृत्यू झाला. ही वार्ता देगलूर येथे कळतात काही मित्र व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृत व्यंकटेश यांच्या मुलीचा मंगळवारी वाढदिवस असल्याने ते देगलूर येथे येऊन वाढदिवस साजरा करण्याच्या बेतात असतानाच काळाचा घाला झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . व्यंकटेश येरावार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून अपघाताची बातमी कळताच येथील मोंढा परिसरातील व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली.