नांदेड : नवीन नांदेड शहरातील ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजमधील पिण्याच्या पाण्यात मृत आणि जिवंत बेंडूक आढळून आले आहेत. या कॉजेलमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या पाण्यात मृत बेंडूक सापडल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित केले आहेत.
दूषित पाणी पिल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेष म्हणजे यापूर्वीही अशा अनेक घटनांच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. मात्र कॉलेज प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही, यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थ्यांनी पिण्याचे पाणी ग्लासात घेतल्यानंतर पाणी अशुद्ध व दुर्गंधीयुक्त येत असल्याने विद्यार्थ्यांनी वॉटर रेफ्रिजरेटरचे झाकन उघडून बघितले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टाक्या आणि रेफ्रिजरेटरची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अपेक्षित असताना, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे कॉलेज व्यवस्थापनाच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने नमुने तपासणी करून विद्यार्थ्यांना सुरक्षित पाणीपुरवठा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.