Nanded News : Chalukya era Yergi lit up in the light of thousands of lamps
देगलूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त देगलूर तालुक्यातील येरगी येथे दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त चालुक्य कालीन सरस्वती मंदिर, शिवमंदिर, हनुमान मंदिर, सोमलिंग मंदिर, व बारव व परिसरात गावातील सर्व महिला पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत हजारों दिवे लावून दिवाळी साजरी केली. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाले होते.
चालुक्य कालीन नगरी येरगीचे आदर्श व्यक्तिमत्त्व संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत कडून दीपावलीनिमित सर्व गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी, गावच्या विकासासाठी हा दीपोत्सव मागील चार वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यावेळी सर्वांनी गावाच्या सुखसमृद्धी साठी देवाची प्रार्थना केली.
देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन येरगी गावच्या इतिहासात मागील चार वर्षापासून सामूहिक दीपावली साजरी करत आहेत. यात गावातील सर्व महिला पुरुष, दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या नवविवाहित महिला उत्साहात सहभागी होतात.
विशेषतः महिलांनी मातीचे दिवे आणि गव्हाच्या पिठापासून दिवे बनवून आणले होते. प्रत्येक महिलांनी जवळपास १०१ दिवे आणले होते. ज्यातून पर्यावरणाची जोपासना करण्याचे संकल्प करण्यात आले. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी हजारो मातीच्या दिव्यांनी गावातील सर्व चालुक्य कालीन मंदिरे दिव्यांच्या पवित्र प्रकाशक न्हाऊन निघाले होते.
अशा हजारो दिव्यांनी गावातील सरस्वती मंदिर, मारुती मंदिर, चालुक्य कालीन शिवमंदिर, सोमलिंग मंदिर, बारव परिसर लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते. या विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे गावातील ज्येष्ठांनी भावोद्वार काढले आणि ग्राम पंचायतकडून आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
या दीपोत्सवात गावातील सर्व कुटुंबातील सदस्य सामील झाले होते. या दीपोत्सव आयोजनामागे पर्यावरणाची जोपासना, ऐतिहासिक संपदेचे जपवणूक व दिवाळीची भारतीय परंपरा आणि संस्कृती टिकवणे असा उद्देश असल्याचे सरपंच संतोष पाटील यांनी सांगितले, दीपोत्सव दख्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी या प्रसंगी पोलिस निरीक्षक आर. एम. हुंडेकर, देगलूर भूमिपुत्र तहसीलदार योगेश टोपे, जेष्ठ पत्रकार गौतम बनसोडे, महिला रोग तज्ञ डॉ. पुजा गायकवाड मेदनकल्लुरचे पोलिस पाटील शिवकुमार जाधव, राजकन्या नागोरी राम येरगीकर, विजय बरसमवार, आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी केला, आभार संतोष पाटील येरगीकर यांनी मानले.
दीपोत्सवात आयोजक सरपंच संतोष पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, सर्व ज्येष्ठ नागरिक, आजी माजी सरपंच, पदाधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, दक्षता समिती, शालेय शिक्षण समिती अध्यक्षांसह गावकरी, बालिका पंचायत राज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, संतोष पाटील मित्र मंडळ आदींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.