किनवट : तालुक्यातील चिखली येथे मंगळवारी दुपारी झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेले अन्य तीन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण चिखली गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील उपसरपंच हुरा बी शेख उस्मान यांचा नातू व शेख मुकर्रम यांचा मुलगा शेख राशीद (वय १५) हा मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या तीन मित्रांसह घराच्या छतावर मोबाईलद्वारे सेल्फी काढत खेळत असताना अचानक जोरदार पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्याचवेळी अचानक वीज त्याच्या अंगावर कोसळल्याने शेख राशीद याचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेले तिन्ही मित्र गंभीर जखमी झाले. त्यापैकी सख्खे भाऊ असलेले आबीद शेख फिरोज (वय १५) व आकीब शेख फिरोज (वय १३) या दोघांना गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, पुढील उपचारासाठी त्यांना तेलंगणातील आदिलाबाद येथे हलविण्यात आले; तर शेख सयान शेख बाबू याच्यावर किनवट शहरातील सुंदर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे चिखली गावात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी शेख राशीद यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना घरांच्या छतावर, मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली थांबणे टाळावे तसेच शक्यतो सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी केले आहे.