Naigaon Ratoli Vitthal Mandir robbery
नायगाव : तालुक्यातील रातोळी येथे अज्ञात चोरट्यांनी विठ्ठल मंदिरात मध्यरात्री चोरी करून दागिने व दानपेटीतील रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक स्थळांची सुरक्षा आणि नायगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १ ते २ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रातोळी येथील विठ्ठल मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील विठ्ठल व रुक्मिणी यांच्या मूर्तीवरील सुमारे एक किलो वजनाचे चांदीचे दोन टोप, रुक्मिणी मातेस अर्पण केलेले सुमारे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
मंगळवारी (दि.२४) सकाळी ही घटना उघडकीस येताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच नायगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी बालाजी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपासासाठी श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मंदिरांसारखी धार्मिक स्थळेही सुरक्षित नसल्याची चर्चा सुरू असून रात्रीच्या गस्त व्यवस्था व पोलिसांच्या दक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच तालुक्यातील धार्मिक स्थळांना सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नायगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.