गॅस वितरणाच्या संतापातून नायगावात चक्काजाम 
नांदेड

Nanded Gas Shortage Protest : गॅस वितरणाच्या संतापातून नायगावात चक्काजाम

रिकाम्या टाक्या रस्त्यावर फेकून नागरिकांचे आंदोलन; नांदेड-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौक येथे गॅस वितरणातील विलंबामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी (दि.१८) सकाळी अचानक चक्काजाम आंदोलन केले. यामुळे नांदेड-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली. रिकाम्या गॅस टाक्या थेट रस्त्यावर टाकून नागरिकांनी रास्ता रोको केल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

आज सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन उफाळून आले. गॅससाठी ऑनलाईन नोंदणी करून OTP प्राप्त झाल्यानंतरही १०-१० दिवस घरपोच सिलिंडर मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. वारंवार पाठपुरावा करूनही गॅस वितरणात सुधारणा होत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला होता.

दरम्यान, गॅस वितरणाबाबत विचारणा करण्यासाठी काही नागरिक शगुन इंडियन कार्यालयात गेले असता कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट डॉ. हेडगेवार चौक गाठत रिकाम्या गॅस टाक्या रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केले. अचानक उभारलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली होती. अखेर पोलिस प्रशासनाने तहसील कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर नायब तहसीलदार येरावर घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्नावर तोडगा काढतील, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेत रस्ता मोकळा केला.

दरम्यान, शगुन इंडियन कार्यालय बंद का होते, याबाबत माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी मॅनेजर निलेश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वाहतूक कोंडी तीव्र होत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) श्याम पानेगावकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळातच महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT