House Burglary  Pudhari
नांदेड

Nanded Theft | कुंटूरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; २.६३ लाखांचा ऐवज लंपास

कुलूपबंद घरच चोरट्यांचे लक्ष्य; वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीती

पुढारी वृत्तसेवा

Naigaon Burglary

नायगाव : नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुंटूर येथील विद्याधर देवकत्ते हे पत्नीसह शेतात गेले असताना चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाट फोडून त्यातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. सायंकाळी घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.

या घरफोडीत सुमारे २.६३ लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलिस ठाण्याचे बीट जमादार कंधारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले.

अलीकडच्या काळात नायगाव, कुंटूर आणि रामतीर्थ परिसरात कुलूपबंद घरांना लक्ष्य करून घरफोड्यांच्या घटनांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढवून आरोपींना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन विशेष मोहीम राबवावी, घरफोडीतील आरोपींना अटक करून नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करावा, अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT