Naigaon Hospital Power Outage  AI
नांदेड

Nanded News | नायगाव रुग्णालयात हेडलाईटच्या उजेडात शवविच्छेदन; आमदार राजेश पवारांकडून गंभीर दखल

चौकशी समितीकडून सुविधांची तपासणी, त्रुटींवर बोट

पुढारी वृत्तसेवा

Naigaon Hospital Power Outage
नायगाव : नायगाव ग्रामीण रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने वाहनाच्या हेडलाईटच्या उजेडात शवविच्छेदन करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेची आमदार राजेश पवार यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

या प्रकरणानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीनेही ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. समितीने शवविच्छेदन गृहातील सुविधा, वीजपुरवठा व्यवस्था आणि घटनेशी संबंधित विविध बाबींची तपासणी केली असून प्राथमिक पाहणीत काही त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली आहे.

भेटीदरम्यान आमदार पवार यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्पण पुपलवाड यांच्याकडे शवविच्छेदन गृहात आवश्यक वीज व्यवस्था का उपलब्ध नव्हती, तसेच अपुऱ्या प्रकाशात शवविच्छेदन करण्याची वेळ का आली, याबाबत स्पष्टीकरण मागितले. ग्रामीण रुग्णालयातील विविध सुविधांतील कमतरतांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गुंडे यांच्या नेतृत्वाखालील चौकशी पथकाने रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. चौकशी समितीच्या भेटीची माहिती मिळाल्यानंतर शवविच्छेदन गृहात तातडीने नवीन वीज व्यवस्था उभारण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

आमदार पवार यांनी रुग्णालय परिसराची पाहणी करून स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि रुग्णांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. विविध विभागांना भेट देत त्यांनी सुरू असलेल्या कामकाजाचाही आढावा घेतला.

यावेळी शवविच्छेदन गृहातील समस्या केवळ वीजपुरवठ्यापुरती मर्यादित नसल्याचेही समोर आले. गेल्या दीड वर्षांपासून एक्स-रे फिल्मची सुविधा उपलब्ध नसणे, पाणीपुरवठ्यातील अडचणी, स्वच्छतेचा अभाव तसेच इतर मूलभूत सुविधांतील त्रुटींबाबत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वारंवार वरिष्ठांचे लक्ष वेधल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर वाहनाच्या हेडलाईटच्या उजेडात शवविच्छेदन करण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा रुग्णालय परिसरात रंगू लागली आहे.

या घटनेमुळे नायगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT