Ganeshotsav Pudhari
नांदेड

Nanded Ganeshotsav | ३२५ गणेश मंडळांत विराजमान झाले गणराय; ५५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

नायगाव, रामतीर्थ व कुंटूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत भक्तिमय वातावरण; पोलिसांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

Naigaon Ganesh Utsav

बाळासाहेब पांडे

नायगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायगाव, रामतीर्थ आणि कुंटूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत यंदा मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. १४ सप्टेंबर रोजी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विविध गावांमध्ये श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे, तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवून सामाजिक एकोपा आणि सामूहिक उत्सवाचा संदेश दिला आहे.

नायगाव हद्दीत १०१ मंडळे

नायगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ३८ गावांमध्ये यंदा १०१ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना करण्यासाठी परवानगी घेतली. त्यापैकी २० गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना स्वीकारली आहे. गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा व्हावा, तसेच अधिकाधिक गावांनी सामूहिक गणेशोत्सवाकडे वळावे, यासाठी पोलिस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिवशंकर शिंदे, चंदुवाघमारे, माधव पवार, वळगे आदींनी गावागावांत जनजागृती व समन्वय साधला.

रामतीर्थ हद्दीत १२६ मंडळांची स्थापना

रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्षेत्रातील ३९ गावांमध्ये १२६ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली. त्यापैकी १३ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना स्वीकारली. एकूण मंडळांपैकी ९० मंडळांनी नियमानुसार परवानगी घेऊन गणेशमूर्तीची स्थापना केली, तर ३६ मंडळांनी विनापरवानगी स्थापना केल्याची नोंद आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच गावागावांत सामूहिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि विक्रम हराळे, पीएसआय जी. के. पेदे, बीट जमादार सी. जे. सोनकांबळे, एल. व्ही. सूर्यवंशी, आर. के. काळे यांनी प्रयत्न केले.

कुंटूरमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ला सर्वाधिक प्रतिसाद

दरम्यान, कुंटूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ठाण्याच्या चार बीटमधील २२ गावांमध्ये २१ ठिकाणी ही संकल्पना राबविण्यात आली. कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १०८ गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात श्रींची स्थापना केली. गावागावांत एकाच गणपतीची स्थापना करून सामूहिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तिन्ही पोलिस ठाण्यांकडून गणेश मंडळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. परवानगी, ध्वनिक्षेपकाचा वापर, मिरवणुकीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच शांतता व सामाजिक सलोखा राखण्याबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांची विशेष नजर ठेवण्यात येत असून गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

एकूण ३२५ गणेश मंडळांत श्रींची स्थापना झाली असून ५५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भक्तीबरोबरच सामाजिक एकोपा आणि सामूहिक उत्सवाचे दर्शन घडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT