नायगाव : नागरिकांना जलद, सुलभ व कमी खर्चात न्याय मिळावा या उद्देशाने नायगाव न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीत ३३८ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात येत तब्बल ६१ लाख ७७ हजार २१० रुपयांची वसुली करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदू के. ब्रह्मे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. जी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १४ मार्च) नायगाव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका विधी सेवा समिती, नायगाव यांच्या वतीने आयोजित या लोकअदालतीचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा समिती अध्यक्षा श्रीमती ए. टी. गिते यांनी भूषविले. लोकअदालतीत प्रलंबित असलेल्या विविध स्वरूपाच्या प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यावर विशेष भर देण्यात आला.
लोकअदालतीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. एकूण २२४० नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यापैकी २८८ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमधून ६१ लाख ७७ हजार २१० रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच फौजदारी स्वरूपातील ३३ प्रकरणे निकाली काढून ६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लोकअदालतीच्या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा झाल्याने संबंधित पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा श्रीमती ए. टी. गिते यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश नंदू के. ब्रह्मे व सचिव एस. जी. देशपांडे यांनी आवश्यक मार्गदर्शन केले.
लोकअदालतीसाठी विविध पॅनलची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये अॅड. एस. व्ही. पक्के यांची पॅनल सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच तालुका विधी सेवा संघ नायगावचे अध्यक्ष एल. एस. तुमदवार व सचिव एस. बी. कदम यांच्यासह इतर वरिष्ठ विधिज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तालुक्यातील विविध बँका, पंचायत समिती नायगाव तसेच इतर संबंधित संस्थांनी समन्वयाने काम करत मोलाचे सहकार्य केले. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकअदालतीच्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करून घेतला.
जलद न्यायाचा प्रभावी मार्ग
लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा होण्यास मदत होत असून नागरिकांना दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा मिळत आहे. नायगाव येथे झालेल्या या लोकअदालतीत मोठ्या प्रमाणावर प्रकरणे निकाली निघाल्याने या उपक्रमाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.