नांदेड ः एका प्रभागातील मतदारांचे नाव दुसऱ्या प्रभागामध्ये, असा प्रकार नांदेड मनपाच्या मागील निवडणुकीत अनेकांच्या बाबतीत घडला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये एका कुटुंबातील सदस्यांचे मतदान दोन वेगवेगळ्या केंद्रांमध्ये विभागल्याचा प्रकार अनेक प्रभागांमध्ये गुरुवारी बघायला मिळाला. या प्रशासकीय घोळाचा ताप मतदारांना सहन करावा लागला. तथापि 10 तासांहून अधिक काळ चाललेली मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याचे सांगण्यात आले.
नांदेड-वाघाळा मनपाच्या 20 प्रभागांतील 81 जागांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळपासून महानगरातील 600 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या अनेक मतदारांना मतदार यादीतील घोळ लक्षात आले. शहराच्या प्रभाग क्र.17मधील राजेंद्रसिंघ शाहू यांनी आपला अनुभव समाजमाध्यमाद्वारे नमूद केला. गुरुद्वारा परिसरात एका कुटुंबातील तीन व्यक्तींची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रांवर समाविष्ट केली गेल्याची तक्रार शाहू यांनी केली. असाच प्रकार श्रावस्तीनगर भागातील काकांडीकर कुटुंबीयांनाही आला. एका वसाहतीतील रहिवासीयांचे मतदान लगतच्या केंद्रांवर न ठेवता दूरच्या केंद्रांवर ठेवण्यात आल्याचा अनुभव अयोध्यानगरीतील नीमा कुळकर्णी व इतर कुटुंबांना आला.
मतदार यादीतील घोळ तसेच एका कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांमध्ये विभागली गेल्याच्या प्रकारावर मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे विचारणा केली असता एकंदर प्रकाराबद्दल त्यांनी कानावर हात ठेवले. या प्रकारामुळे अनेक मतदारांची एकीकडून दुसरीकडे धावपळ झाल्याचे दृश्य अनेक प्रभागांमध्ये बघायला मिळाले.
गुरुवारच्या ढगाळ वातावरणात मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर नेहमीप्रमाणे पहिले दोन-तीन तास मतदानाची एकंदर गती अत्यंत संथ होती. पहिल्या दोन तासांत 7.16 टक्के मतदान झाले. नंतरच्या दोन तासांत त्यांत 10 टक्क्यांची भर पडली. दुपारी साडेतीन पर्यंतच्या सहा तासांत 2 लाख 9 हजार 25 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची सरासरी 41.65 टक्के होती. दुपारी 4 नंतर मात्र मतदान केंद्रांच्या परिसरात लक्षणीय गर्दी बघायला मिळाली. पहिल्या सहा तासातील एकंदर कल पाहता 60 ते 65 टक्के मतदानाची नोंद अपेक्षित आहे.
भाजपा नेते खा.अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांनी परंपरेनुसार शिवाजीनगर प्रभागातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी सकाळच्या पहिल्या सत्रातच तरोडा (खु.) गावातील केंद्रावर मतदान केले. शहरी भागातील वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावून दिवसभर वेगवेगळ्या प्रभागांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. खा.रवींद्र चव्हाण व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रभाग क्र.4मध्ये अनेक केंद्रांना भेट दिली. मतदान काळात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिस प्रशासनातील सूत्रांनी दिली.
जुन्या नांदेडमध्ये भाजपाच्या एका उमेदवाराने आपला पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवाराला दिला असल्याची अफवा समाजमाध्यमांतून पसरविण्यात आली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर भाजपाच्या संंबंधित उमेदवाराने इतवारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
आज मतमोजणी !
तीन वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय राजवटीखाली गेल्यानंतर नांदेड मनपातील आगामी लोकनियुक्त राजवटीच्या आगमनाचा महत्त्वपूर्ण टप्पा गुरुवारी पार पडल्यानंतर पुढील 5 वर्षांचे कारभारी कोण, याचा फैसला शुक्रवारच्या मतमोजणीनंतर होईल. मतमोजणीची प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतन परिसरात शुक्रवारी सकाळी सुरू होणार आहे. मतदानानंतर पाच माजी महापौरांसह, काही उपमहापौर, अनेक माजी नगरसेवक यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.