नांदेड ः 81 सदस्यीय नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्याच पक्षाचा महापौर होणार असे दावे-प्रतिदावे केले असले तरी उद्या शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीत नांदेडचा सातबारा कुणाच्या नावावर? हे मतदार सिद्ध करणार आहेत.
या निवडणुकीत भाजप, शिंदे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार गट), एमआयएम आणि काही स्थानिक आघाड्यांनी उमेदवार उभे केले होते. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही तासात मतदान केंद्रावर मतदार बोटावर मोजण्याइतके दिसून येत होते. परंतु दुपारनंतर विविध प्रभागातील मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढली होती.
नांदेड उत्तर आणि दक्षिणध्येमध्ये मुख्यतः भाजपा आणि शिवसेनेमध्येच लढत बघायला मिळाली. दोन्ही पक्षांचे बुथप्रमुख मतदान केंद्रावर मतदार याद्यांमधील नांवे, त्यांचे मतदान केंद्र व इतर माहिती व्यवस्थितपणे देताना दिसत होते. बहुतांश मतदान केंद्रांची अदला-बदल झाल्यामुळे नावे शोधण्यात मतदारांना अडचणी येत होत्या. अनेक मतदारांना त्यांचे मतदान केंद्र बदलल्याचे ऐनवेळी सांगण्यात येत होते.
काही पक्षांनी जुन्याच चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे, तर काहींनी आपल्या पारंपारिक मतदारांना गृहीत धरल्यामुळे मतदारांनी क्रॉस व्होटिंगचा प्रयोग करून आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली होती. शिवाय अनेक प्रभागात उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याच्याही तक्रारी मतदान केंद्रावर ऐकावयास मिळाल्या. त्याचाही फटका उमेदवारांना बसू शकतो, अशी स्थिती आहे.
महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 42 सदस्यांची आवश्यकता आहे.परंतु कोणत्याही एका पक्षाने 81 उमेदवार उभे केले नाहीत. झालेली क्रॉस वोटींग,उच्चवर्गीय समाजाला आपलीच व्होट बँक म्हणून गृहीत धरणे, मतदारांशी संपर्क न साधणे आदी बाबींचा फटका प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला इतर पक्षांच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही, हे सुद्धा तितकेच खरे.
निवडून येण्याची क्षमता व जनसंपर्क असलेल्या काही उमेदवारांना तिकीट नाकारल्यामुळे अन्य पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मतदारांची सहानुभूती मिळाल्याचे चित्र आहे. अशा उमेदवारांसाठी पक्षीय उमेदवारांचा विचार न करता काही कार्यकर्तेही त्याच्या बाजुने ठामपणे उभे राहिल्याचे दिसत होते.