नांदेड : जिल्ह्यात वाढत्या सायबर आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'म्युल बँक अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींवर नांदेड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल ६० विविध बँकांचे पासबुक, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
पैशांचे आमिष दाखवून उघडली खाती
रेल्वे स्टेशनसमोरील गवळीपुरा भागात काही जण अशिक्षित आणि सामान्य नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून बँकांमध्ये खाती उघडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी गवळीपुरा रोडवर छापा मारून हर्षदसिंह राजुसिंह अरोरा (वय २४, रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विविध बँकांचे ६० पासबुक, एटीएम कार्ड आणि विविध कंपन्यांचे ८ सिमकार्ड मिळून आले.
तपासादरम्यान, बालाजी सोपान गुंजाळे (रा. बळीरामपूर, ता. नांदेड ग्रामीण) हा व्यक्ती हर्षदसिंह याला बँक खाती उघडण्यासाठी नागरिक उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट झाले. हे दोघे संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांचे एटीएम आणि पासबुक काढून घेऊन सायबर गुन्हेगारांना पुरवत होते.
देशभरातील फसवणुकीत खात्यांचा वापर
सायबर पोलिसांनी 'एनसीसीआरपी' पोर्टल आणि 'मनी ट्रेल'च्या विश्लेषणातून या खात्यांमधील व्यवहारांचा शोध घेतला. यात देशभरातील नागरिकांना ऑनलाइन गुंतवणूक, 'डिजिटल अरेस्ट' आणि शेअर मार्केटमधील नफ्याचे आमिष दाखवून केलेल्या फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी या खात्यांचा वापर होत असल्याचे समोर आले. आतापर्यंत या खात्यांमधून सुमारे १९ लाख ४१ हजार रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यात आला आहे. प्रत्येक खात्यामागे आरोपींना ठरलेले कमिशन मिळत होते.
काय असते 'म्युल अकाउंट'?
सायबर गुन्ह्यांमधील फसवणुकीची रक्कम विविध खात्यांमध्ये वळवून पोलिसांना चकवा देण्यासाठी काही व्यक्ती स्वतःच्या किंवा इतरांच्या नावाने बँक खाती पुरवतात. अशा खात्यांना 'म्युल अकाउंट' (Mule Account) म्हटले जाते. नागरिकांनी पैशांच्या आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक अनोळखी व्यक्तीला देऊ नये. आपल्या खात्याचा वापर सायबर गुन्ह्यात झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.