Mukhed primary school approval Pudhari
नांदेड

Nanded News | ऊसतोड कामगारांची मुले शिकणार; मुखेड तालुक्यात नऊ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर प्राथमिक शाळेला मान्यता

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून तांड्यावर प्राथमिक शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत

पुढारी वृत्तसेवा

Mukhed primary school approval

मुखेड: मुखेड तालुक्यातील रामदास पवार तांड्यावर अखेर नऊ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर प्राथमिक शाळेला मान्यता मिळाली आहे. ग्रामीण भागातील तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून तांड्यावर प्राथमिक शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेथे शिक्षक नियुक्ती करण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबादपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या रामदास पवार तांड्यावर २०१७ मध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी शिक्षक नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळे अवघ्या तीन महिन्यांत शिक्षकाची बदली करण्यात आली आणि शाळा बंद पडली. परिणामी तांड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज नऊ किलोमीटर अंतर पायी जाऊन मुक्रमाबाद येथे जावे लागत होते.

तांड्यावर पुन्हा शाळा सुरू व्हावी यासाठी स्थानिक रहिवासी प्रा. डी. आर. पवार यांनी पुढाकार घेत स्वतःच्या मालकीची ४२ गुंठे जमीन जिल्हा परिषदेला हस्तांतरित केली. शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेत तांड्याजवळ शिक्षणाची सुविधा नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र दीर्घकाळ सकारात्मक निर्णय झाला नव्हता.

दरम्यान, २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ. तुषार राठोड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून हा विषय शासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ भोयर यांनी आवश्यकतेनुसार शाळांना पुन्हा मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आमदार डॉ. तुषार राठोड यांनी शिक्षणमंत्री तसेच नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेल्या वस्तुनिष्ठ अहवालात शाळेसाठी आवश्यक विद्यार्थी संख्या उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या संपूर्ण प्रक्रियेत प्रा. डी. आर. पवार यांनी शासन स्तरावर विविध लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे निवेदने देत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर ७ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासन निर्णय व अहवालाच्या आधारे रामदास पवार तांड्यावर प्राथमिक शाळेला मान्यता दिली. नऊ वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या यशामुळे तांड्यावरील पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT