मुखेड- मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतीला 12 तास विद्युत पुरवठा केला जावा तसेच वसंतराव नाईक सशोधन व प्रशिक्षण केंद्राला 100 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आ. डॉ. तुषार राठोड यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्यानंतर उभी पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्य़ांना दिलासा देण्यासाठी सिंचनासाठी केला जाणारा विद्युत पुरवठ्याचा कालावधी 8 तासांचा असून तो अपुरा पडत आहे. पिकांच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस पडत नाही तोपर्यत कृषी पंपासाठी केला जाणाऱ्या विद्युत पुरवठ्याचा कालावधी वाढवून तो 12 तास करावा. अशी मागणी राठोड यांनी केली.
या व्यतिरीक्त व्हिजेएनटी आणि एसबीसीच्या विद्य्यार्थाच्या शैक्षणिक व सामाजीक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्राला 100 कोटीचा निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच बार्टी, सारथीच्या धर्तीवर या संस्थेच्यामार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, परदेशी शिष्यवृती स्वाधारसारख्या योजना राबवून ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी तुषार राठोड यांनी केली. वरील मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे राठोड यांनी सांगितले.
मुख्यमत्री देवेंद्र फडणवीसाना मुखेड भेटीचे निमंत्रण
मुखेड कंधार मतदारसंघातील वसंतनगर येथे उभारण्यात आलेल्या साईबाबा मंदिरात, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण या धार्मिक कार्यास उपस्थित राहण्यासंबंधी राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री हे या कार्यक्रमास आल्यास मतदारसंघातील अनेक विकासप्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.