Nanded News 
नांदेड

Nanded News | मुखेड-बोधन रस्ते कामाचा ६ वर्षांचा वनवास संपला; जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाकेबाज निर्णयाने काम सुरू

प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे

पुढारी वृत्तसेवा

मुखेड : गेल्या सहा वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या लोहा-कंधार-मुखेड-बोधन या महत्त्वाच्या राज्य महामार्गाचे काम अखेर मार्गी लागले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे १५ किलोमीटरच्या प्रलंबित कामाला १३ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरुवात झाली असून, यामुळे या भागातील दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

नेमका पेच काय होता?

१९७२ च्या दुष्काळी काळात मजुरांना काम मिळावे म्हणून लोहा-कंधार-मुखेड-खानापूर-बोधन या आंतरराज्यीय रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी हा रस्ता ८० फूट रुंदीचा निश्चित करण्यात आला होता. २०१९ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३६० कोटींची तरतूद केली आणि याला 'राज्य मार्ग १६' चा दर्जा दिला. मात्र, केरूर-धनज व एकलार येथील काही शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी (मावेजा) उच्च न्यायालयात धाव घेतल्याने गेल्या ६ वर्षांपासून या रस्त्याचे १५ कि.मी.चे काम ठप्प होते.

जिल्हाधिकाऱ्यांचा 'ॲक्शन मोड'

उच्च न्यायालयाने हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवल्यानंतर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कर्तव्यदक्षता दाखवत तातडीने भूमी अभिलेख विभागाला रस्ता मोजणीचे आदेश दिले. मोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवली. तहसीलदार जाधव यांनी स्वतः घटनास्थळी थांबून मोजणी प्रक्रिया पूर्ण करून घेतली.

अहवाल आणि कामाला सुरुवात

भूमी अभिलेख विभागाने हा जुना रस्ता ८० फुटांचाच असल्याचा स्पष्ट अहवाल दिल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १३ फेब्रुवारी २०२६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आमदार डॉ. तुषार राठोड यांचा पाठपुरावा या रस्त्याचे काम पूर्ववत व्हावे यासाठी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली होती. न्यायालयासमोर रस्त्याची वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्याबाबत त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या.

नागरिकांत आनंदाचे वातावरण

रस्त्याचे काम सुरू झाल्याने मुखेड-देगलूर भागातील प्रवासाची मोठी समस्या सुटणार आहे. दर्जेदार रस्ता उपलब्ध झाल्याने भविष्यातील अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि बस सेवा अधिक सक्षम होईल, अशी खात्री नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT