माळाकोळी; पुढारी वृत्तसेवा : माळाकोळी पासून दोन किलोमीटर अंतरावरील बेलवाडी येथील एका तरुण मुलाने जन्मदात्या आईचा लोखंडी गतीने गळा चिरून खून केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोमवारी (दि. 23) पहाटे तीनच्या सुमारास आई गंगाबाई बालाजी केंद्रे (वय 50 वर्ष) या झोपेत असताना मुलगा नरसिंह बालाजी केंद्रे (वय 34) या तरुणाने आईचा खून केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, नरसिंह बालाजी केंद्रे हा अभियंत्याचे शिक्षण घेऊन बेलवाडी तालुका लोहा येथे आला होता. माझ्या नावावर जमीनीचे क्षेत्र कमी केले असून माझ्या नोकरीसाठी तुम्ही कुठलेही प्रयत्न करीत नाहीत त्यामुळे माझे लग्न जुळत नाही, हा राग मनात धरून तरुणाने आपल्या आईच्या गळ्यावर आणि हातावर लोखंडी गतीने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गंगाबाई केंद्रे यांचा मृत्यू झाला.
आरोपी नरसिंह केंद्रे यांचे वडील बालाजी एकनाथ केंद्रे (वय 54 वर्षे) यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे हे करीत आहेत.