Mahur Residential School Incident Pudhari
नांदेड

Mahur Student Injured | श्रीक्षेत्र माहूर येथील निवासी शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनी गंभीर; विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनी जखमी

रॅलिंगवरून घसरल्याने डोक्याला गंभीर दुखापत; दुसरी विद्यार्थिनी विजेच्या धक्क्याने जखमी

पुढारी वृत्तसेवा

Mahur Residential School Incident

श्रीक्षेत्र माहूर : येथील पीएमश्री अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शुक्रवारी (दि. १८) सकाळी दोन विद्यार्थिनींसोबत घसरणे आणि विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडल्या. तिसऱ्या मजल्यावरील रॅलिंगवरून खाली पडल्याने सातवीत शिकणारी रितिका नुरसिंग राठोड (वय १३) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तर याच वर्गातील अंकिता विशाल वाढवे (वय १३) हिला विजेचा धक्का लागल्याने किरकोळ दुखापत झाली आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रितिका राठोड ही निवासी शाळेच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील रॅलिंगवरून घसरून खाली पडली. या दुर्घटनेत तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच नाकातून रक्तस्राव होत असल्याने तिला तातडीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय माहुरे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी तिला यवतमाळ येथे हलविण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास याच शाळेतील विद्यार्थिनी अंकिता विशाल वाढवे हिला विजेचा धक्का लागला. तिलाही माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. संजय माहुरे यांनी सांगितले.

वार्डनचे पद रिक्त

या घटनेनंतर निवासी शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या इमारतीतील रॅलिंग, विद्युत व्यवस्था आणि अन्य सुरक्षाव्यवस्थेची तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे.

वार्डनचे पद रिक्त असून आपण लिपिक पदावर कार्यरत आहोत. सध्या आपल्याकडे वार्डनचा अतिरिक्त प्रभार आहे. रितिकाला यवतमाळ येथे दाखल करून घेण्यास नकार देण्यात आल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आल्याने तिला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
- प्रीती आद्ये, प्रभारी वार्डन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT