विशाल जाधव, अर्चना जाधव Pudhari
नांदेड

Nanded Crime | लोहा येथे कौटुंबिक वादातून पत्नीवर तीन गोळ्या झाडल्या; पती पसार

घटनास्थळी पोलीस अधीक्षकांची पाहणी; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

Wife Shot At Loha Nanded

लोहा : लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी (दि. ६) रात्री उशिरा कौटुंबिक वादाचे हिंसक रूप धारण करत पतीने पत्नीवर गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पत्नी अर्चना जाधव या जखमी झाल्या असून त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी पती विशाल जाधव फरार झाला असून त्याच्याविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक कॉलनीत राहणारे विशाल जाधव आणि अर्चना जाधव यांच्यात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर विशाल जाधव याने स्वतःकडे असलेल्या गावठी पिस्तुलातून पत्नीवर सलग तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. या गोळीबारात अर्चना जाधव यांच्या कानाजवळ दुखापत झाली. त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

दरम्यान, लोहा शहरात अशा प्रकारचा गोळीबार प्रथमच घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी विशाल जाधव हा घटनेनंतर पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT