नायगाव : कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकल्पाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून संबंधित गुत्तेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिरिक्त पर्यायी पाईपलाइन मंजूर करावी, अशी मागणी कांतराव निकलपुरे यांनी जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
शेतीला पाणीपुरवठा व्हावा यासाठी मौजे लालवंडी, सुगाव, तलबिड-ताकबीड, कोलंबी, मांजरम, अंचोली, सोमाठाना, नायगाव, नायगाववाडी, गोदमगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यानुसार प्रकल्पाचे काम 2023-24 मध्ये पूर्ण झाले आणि 2025 मध्ये पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला.
बळेगाव (ता. उमरी) येथील गोदावरी नदीवर उभारलेल्या या प्रकल्पातील रायजिंग मेनचे काम सिद्धार्थ कन्स्ट्रक्शन, नागपूर या गुत्तेदाराने केले. मात्र, कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. लोखंडी पाईपलाइन शेतकऱ्यांना पाणी मिळण्याआधीच गंजली असून तब्बल 20-25 ठिकाणी भेगा व होल पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचतच नाही. उलट लिकेज पाणी बळेगाव व रुई येथील शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर निकलपुरे यांनी जलसंपदा मंत्री यांना उद्देशून प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, पर्यायी पाईपलाइन मंजूर करावी, तसेच विद्यमान पाईपलाइनची तातडीने दुरुस्ती करून वेळेवर पाणीपुरवठा सुनिश्चित करावा,अशी मागणी केली आहे. कोलंबी जल उपसा सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचार व निकृष्ट कामामुळे शेतकरी त्रस्त झाले असून या प्रकरणी कडक कारवाईची अपेक्षा वाढली आहे.