English medium tribal school Nanded
किनवट : अनुसूचित जमातीतील (आदिवासी) विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिलीमध्ये नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक पालकांनी १५ मे २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत किनवट प्रकल्प क्षेत्रातील पात्र आदिवासी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शासनमान्य नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अर्ज २० एप्रिलपासून प्रकल्प कार्यालयातील माहिती सेतु सुविधा केंद्र तसेच सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीतील असावा आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत मर्यादित असावे. इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय सहा वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
अर्जासोबत जातीचा दाखला, जन्मतारीख प्रमाणपत्र, आधारकार्ड, एप्रिल २०२६ नंतरचे उत्पन्न प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि पालकांचे संमतीपत्र जोडणे बंधनकारक आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, आदिम जमातीतील विद्यार्थी तसेच विधवा, घटस्फोटित, निराधार व परित्यक्त महिलांच्या मुलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
निवड प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांना मंजूर निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. एकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर शाळा बदलण्यास परवानगी दिली जाणार नाही. अर्जातील चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पात्र पालकांनी पूर्ण अर्ज १५ मे २०२६ पर्यंत माहिती सेतु सुविधा केंद्र, प्रकल्प कार्यालय, किनवट येथे सादर करावेत. मुदत संपल्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.