Kinwat Police Illegal Liquor Seized
किनवट : अवैध हातभट्टी दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी किनवट पोलिसांनी रविवारी (दि. ८) मासरेड मोहीम राबवत बोधडी बु. येथील शिवारात धाड टाकली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात मोहफुलाचे रसायन जप्त करण्यात आले. सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलीस ठाण्याच्या पथकाने मौजे बोधडी बु. येथील जगन्नाथ बाबा माळ शिवारात छापा टाकला. यावेळी हातभट्टी गावठी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले अंदाजे ६०० लिटर मोहफुलाचे रसायन आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करून पुढील कारवाई केली.
या प्रकरणी उत्तम एकनाथ केंद्रे (रा. बोधडी बु.) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक देवीदास फडेवार, पोलीस हवालदार सिद्धार्थ वाघमारे, प्रदीप आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल संजय रांजणे तसेच महिला जमादार सुमिता डुकरे यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.