Kinwat Panchayat Samiti Pudhari
नांदेड

Nanded News | नालीच्या ‘एमबी’साठी सरपंचाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; किनवट पंचायत समिती आवारात खळबळ

नंदगावच्या कामाची तातडीने पाहणी करून मूल्यांकन करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे निर्देश;

पुढारी वृत्तसेवा

Kinwat Panchayat Samiti

किनवट : नंदगाव येथील नाली बांधकामाचे मूल्यांकन करून ‘मेजरमेंट बुक’ (एमबी)मध्ये नोंद घेण्याची प्रक्रिया रखडल्याच्या निषेधार्थ सरपंच युवराज भडांगे यांनी सोमवारी (दि. ३१) किनवट पंचायत समितीच्या आवारात अंगावर डिझेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नंदगाव येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. या कामाच्या गुणवत्तेबाबत गावातील बालाजी जनार्धन जाधव यांनी पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पंचायत समितीच्या संबंधित विस्तार अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष नाली बांधकामाची पाहणी केल्याची माहिती आहे.

तक्रार प्रलंबित असल्याने या कामाची ‘एमबी’ नोंद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कामाचे मूल्यांकन करून ‘एमबी’ नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी सरपंच भडांगे यांनी केली होती.

इशाऱ्यानुसार सोमवारी भडांगे पंचायत समितीच्या आवारात डिझेल घेऊन आले. त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना रोखले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

घटनेनंतर गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी भडांगे यांना आपल्या कक्षात बोलावून चर्चा केली. संबंधित नाली बांधकामाचे नियमांनुसार मूल्यांकन करून ‘एमबी’मध्ये नोंद घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित उपअभियंत्यांना दूरध्वनीद्वारे दिल्याचे सांगण्यात आले. तसेच एका दिवसात कामाचे मूल्यांकन करून नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या आश्वासनानंतर सरपंच भडांगे यांचे समाधान झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तणाव निवळला. दरम्यान, नाली बांधकामाच्या गुणवत्तेबाबत झालेली तक्रार, कामाचे मूल्यांकन आणि देयकाची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील पुढील स्थिती स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT